पीक विमा अद्यतने: प्रलंबित पेमेंट्स आणि शेतकऱ्यांचे प्रश्न
२०२३ च्या खरिप हंगामातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा रकमेचे पेमेंट्स अद्याप मिळालेले नाहीत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील विविध विभागांत विमा कंपन्यांकडून ₹२,८०० कोटी अद्याप प्रलंबित आहेत. सरकारने ₹१ मध्ये पीक विमा योजना लागू केल्यानंतर १.७ कोटी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे, २१ दिवसांपेक्षा जास्त पावसामुळे आणि मातीतील कमी ओलाव्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

विविध ट्रीगर आणि पिकांचे पंचनामे झाले तरीही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप दिलेली नाही. कृषी विभागाच्या नवीनतम माहितीनुसार, नुकसान भरपाईसाठी ₹७,३२२ कोटी निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ₹४,५२४ कोटी वितरित करण्यात आले असून ₹२,७९८.४३ कोटी प्रलंबित आहेत. यामध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे सर्वांत जास्त रक्कम प्रलंबित आहे. या कंपनीने ₹३,३०९ कोटींपैकी फक्त ₹८०२ कोटी वितरित केले असून, ₹२,५०७ कोटी अद्याप प्रलंबित आहेत.
भारतीय कृषी विमा कंपनीने ₹९२४ कोटींच्या निश्चित नुकसान भरपाईपैकी ₹७०४ कोटी वितरित केले आहेत, तर ₹२१९ कोटी प्रलंबित आहेत. एक वर्ष उलटून गेले तरीही मागच्या हंगामातील विमा रक्कम मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतोय. सरकारची ₹१ मध्ये पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments