मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तर आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरीही काही महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या शुल्कांमुळे महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहेत. याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.

महिलांना नेमकी काय अडचण येत होती?

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे, त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमम बॅलेन्स, मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे शुल्क तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 तसेच 3000 रुपयांतील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही.

राज्य सरकारने घेतली दखल

याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही, असे सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्याच याच अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांवरून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Categories: Govt. Semi

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now